Share

Shri Shivstuti in Marathi | तुजवीण शंभो मज कोण तारी

by Swar Sanatan · January 9, 2026

श्री शिवस्तुति

कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥

रवींदु दावानल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥

जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥

उदार मेरू पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी जो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।
भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोष्ह महाविदारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥

कर्पूरगौरीं गिरिजा विराजे ।
हळाहळे कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदुःखें स्मरणें निवारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥

स्मशानक्रीडा करितां सुखावे ।
तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्तीं जटाभस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा ।
तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥

नंदी हराचा हर नंदिकेश ।
श्री विश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥

भयानक भीम विक्राळ नग्न ।
लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥

इच्छा हराची जग हें विशाल ।
पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥

भागीरथीतीर सदा पवित्र ।
जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या ।
पादारविंदीं वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥

कीर्ती हराची स्तुति बोलवेना ।
कैवल्यदाता मनुजां कळेना ।
एकाग्रनाथ विश अंगिकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥

सर्वांतरीं व्यापक जो नियंता ।
तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकीं उमा ते गिरिरूपधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥

सदा तपस्वी असे कामधेनू ।
सदा सतेज शशि कोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥

कर्पूरगौर स्मरल्या विसांवा ।
चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंतीं स्वहीत सूचना विचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥

WhatsApp Icon WhatsApp Channel
Join Now
Instagram Icon Instagram Channel
Follow Now
YouTube Icon YouTube Channel
Subscribe Us

विराम काळीं विकळ शरीर ।
उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥

सुखावसाने सकळें सुखाचीं ।
दुःखावसाने टळती जगाचीं ।
देहावसानें धरणी थरारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥

अनाहतशब्द गगनीं न माय ।
त्याचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगें करुणा कुमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥

शांति स्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।
शोभा जडीत वरि किंकिणीची ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥

जिवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंच तुटली उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥

निधानकुंभ भरला अभंग ।
पहा निजांगें शिव ज्योतिलिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरीं भैरव विश्व तारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥

जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळां मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे ।
संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथें भवपैलतीरीं ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा ।
मना जपें रे शिवमंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥

एकांती ये रे गुरुराज स्वामी ।
चैतन्यरूपीं शिव सौख्यनामी ।
शिणलों दयाळा बहुसाल भारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥

शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ॥
काळाचें भय मानसीं धरुं नको दुश्टांस शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥

You may also like